कर्जत-जामखेड तालुक्याचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून अनेक चांगले उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. यातील काही उपक्रमांना सुरुवात झाली असून काही नियोजनाच्या पातळीवर आहेत. आज सोशल मिडियाची व्याप्ती झपाट्याने वाढत आहे. ग्रामीण भागातील बहुसंख्य नागरिकांनाही सोशल मीडियाची जवळून माहिती असल्याचं निदर्शनास आले आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील या लोकांपर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट आहे. त्यासाठी कर्जत-जामखेडच्या नागरिकांपर्यंत त्वरित पोहोचता यावं यासाठी हा के जे वेब रेडिओ सुरू करण्यात आला आहे.
आपण वेबसाइटच्या माध्यमातून हा रेडिओ ऐकू शकता. कृषी क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाविषयी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा के जे रेडिओ सुरू करण्यामागील मुख्य उद्देश आहे. तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासोबतच शिक्षण, आरोग्य, सामाजिक उपक्रम आणि सरकारी योजनांविषयी वेळोवेळी अद्ययावत माहितीही या रेडिओच्या माध्यमातून देता येणार आहे. हे रेडिओ माध्यम शेतकरी, महिला शेतकरी, युवा, बचत गटाच्या महिला, डॉक्टर, स्थानिक कलाकार, व्यावसायिक, शिक्षक आणि तज्ज्ञ यांना त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी उपयुक्त ठरेल. कर्जत आणि जामखेड येथील नागरिकांसाठी हा रेडिओ एक सशक्त व्यासपीठ म्हणूनही उपलब्ध देईल. स्थानिक शेतकरी शेतीबाबतचा आपला अनुभव या रेडिओच्या माध्यमातून इतर शेतकर्यांना सांगू शकतील. कृषीविषयक तज्ञ आधुनिक शेतीविषयी शेतकर्यांना मार्गदर्शन करतील. मुले, युवा आणि महिला यांच्यातील कलागुणांना व्यासपीठ म्हणूनही या रेडिओचा वापर होणार असल्याने ते आपले कलाविष्कार या रेडिओवर सादर करू शकतील. स्थानिक कलाकार आपली कला आणि कौशल्ये सादर करतील. या सर्वांना के जे रेडिओद्वारे मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाल्याने नव नव्या संधी तयार होतील, असा विश्वास आहे.